हुतात्मा नाग्या महादू कातकरी…
१९३० साली महात्मा गांधींनी स्वातंत्र्य लढ्याचा भाग म्हणून कायदेभंगाच्या चळवळीचे रणशिंग फुंकले. उरणजवळच्या चिरनेर येथेही आयोजन करण्यात आले होते. तिथे मिठाऐवजी जंगल माध्यमाचा वापर केला होता. आम्ही इंग्रजांचे सरकार मानत नाही, त्यामुळे त्यांनी लागू केलेला कायदा पाळण्याचा प्रश्न उदभवत नाही असे या देशभक्तांचे म्हणणे होते.
रायगडच्या गौरवशाली इतिहासात महाडचा सत्याग्रह,गोवा मुक्ती लढा,जंजिरा मुक्ती लढा, चरीचा शेतकरी संपाएवढेच महत्व चिरनेरच्या जंगल सत्याग्रहास आहे. जंगलावर अवलंबुन असलेल्या गरीब आणि आदिवासींच्या उपजिविकेच्या साधनांवरच जंगल कायद्याच्या माध्यमातून इंग्रजांनी बंदी घातल्यानं त्याविरोधात देशभर संतापाची लाट उसळली होती.राजकीय आणि सामाजिक दृष्टया जागरूक असलेल्या रायगडातही त्याचे तीव्र पडसाद उमटले. उरण तालुक्यातील चिरनेर येथे २५ सप्टेंबर १९३० रोजी झालेला जंगल सत्याग्रह हा त्याचाच भाग होता. नियोजित कार्यक्रमानुसार परिसरातील हजारो शेतकरी कायदेभंग कऱण्यासाठी आक्कादेवीच्या डोंगरावर जमा झाले. आंदोलकांपैकी बहुतेकजण अशिक्षित आणि सामांन्य कुटुंबातील होते. आंदोलनाचा भाग म्हणून त्यांनी कुर्हाडीने सागाच्या झाडावर वार करायला सुरूवात केली. आंदोलकांच्या या कृतीनं फौजदार राम डी.पाटील याचं पित्त खवळलं. त्याने मामलेदार केशव जोशी यांच्याकडे जमावावर गोळीबार करण्याची परवानगी मागितली. मात्र जोशींनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार्या स्वातंत्र्यप्रेमी जनतेवर गोळ्या झाडण्यास नकार दिला.परवानगीही नाकारली. त्यामुळे पाटील अधिकच खवळले आणि त्यांनी थेट मामलेदार जोशींवरच गोळ्या झाडून त्यांच्या शरीराची चाळण करून ठार केले. 'ताबडतोब मागे फिरा नाहीतर तुमचीही गत अशीच होईल म्हणून फर्मावले'. हा प्रकार पाहून जमाव थोडा दचकला काही पाऊले मागे गेला मात्र पळून गेला नाही. स्वातंत्र्याचा त्यांचा निश्चय ठाम होता. कोणताही त्याग करण्याची तयारी होती. मागे गेलेल्या स्त्री-पुरुषांमधून पंधरा वीस तरुणांचा एक गट त्वेषाने समोर आला. त्यांच्याकडे हत्यारे होती. त्यांनी ती ब्रिटीश अधिकाऱ्यांवर चालवली नाहीत. त्यांचा अहिंसेवर विश्वास होता. भारतीय स्वातंत्र्याचा जयघोष करत जंगलावर चालवली. मात्र चिडलेल्या ब्रिटीश अधिकाऱ्याने स्वतः गोळीबार सुरु केला. त्यामध्ये बारा सत्याग्रही हुतात्मे झाले. त्यात केवळ २१ वर्षाचा अत्यंत गरीब कुटुंबातील परंतु अत्यंत निडर व धाडसी असा वीर नाग्या कातकरी आंदोलन करताना पोलिसांच्या गोळीबारात धारातीर्थी पडला.
२५ सप्टेंबर हा हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांचा स्मृतिदिन मोठ्या प्रमाणात पाळला जातो.
#आदिवासीक्रांतिकारक
#क्रांतीकारक #स्वातंत्र्यसैनिक
Comments
Post a Comment