________हांडाभर पाणी______
मी पाचवी सहावीला असेल त्या वेळची गोष्ट आहे.पीण्याच्या पाण्यासाठी किती धडपड करावी लागते हे मी प्रत्यक्ष आनुभवले आहे.आमच्या गारवाडी गावामध्ये मोजक्यात तीन चार विहिरी होत्या,त्यांना पण उन्हाळ्यात पाणी नसायचं,आमच्या गावाचे साधारण तीन भाग पडतात मुख्य वाडी,बांगरवाडी आणि पिंपळदरा गावात पुरेसं पाणी नसल्याने आजूबाजूच्या गावांमध्ये पाणी आणण्यासाठी जावं लागायचं. पिंपळदऱ्यातील लोक कारंडी गाव जवळ असल्याने कारंडीवरून पाणी आणायचे बांगरवाडी कारांना चिल्हेवाडी जवळ असल्याने चिल्हेवाडीतून पाणी आणायचे तर वाडीतील मंडळी खालच्या केळीवरून पाणी आणायचे
आता या दुसऱ्या गावांमधून पाणी आणायचं पण सोपं नव्हतं खालच्या केळीवरून पाणी आणायचं म्हटल्यावर मध्ये एक डोंगर आहे तो डोंगर चढून पुन्हा त्या बाजूला उतरून पण बरंच लांब चालत जावं लागायचं पुन्हा भरलेला हांडा डोक्यावर घेऊन पुन्हा त्या पाऊलवाटेने डोंगर चढून उतरून घरी यावं लागायचं.पिंपळदऱ्यातील लोंकांची पण तीच परिस्थीती. बांगरवाडीच्या लोकांना पण चिल्हेवाडीचा घाट उतरून पुन्हा भरलेला हांडा डोक्यावर घेऊन चिल्हेवाडीचा घाट चढून पाणी आणायला लागायचं.एक हंडाभर पाण्यासाठी कमीत कमी दीड तासाची पायपीट करावी लागायची.
गावामध्ये मोजक्या तीनच विहिरी होत्या चाकाची विहीर,मोठी विहीर आणि पाटलाची विहीर.या तिन्ही विहिरीवर रात्रंदिवस नंबर लागलेले असायचे.आम्ही पाच सहा जण चाकाच्या विहिरीवरच झोपायला जायचो.त्या विहिरीवर रात्रीतून फक्त पाच सहा हांडे पाणी भेटायचं,म्हणजे एकाच्या वाट्याला साधारण एकच हांडाभर पाणी भेटायचं.ती विहीर पण चार पाच परस खोल आहे.पण त्या हांडाभर पाण्यासाठी जीव धोक्यात घालून दोरखांडाच्या मदतीने विहिरीत उतरून वाटीने पाणी बादलीत भरायचे मग एकजण वरती घ्यायचा.कधी अंदाज चुकला आणि हांडा पूर्ण नाही भरला एक तांब्याभर पाणी जरी हांडा भरायला कमी पडलं तरी त्या एक तांब्याभर पाण्यासाठी अर्धा पाऊण तास विहिरीत त्या अंधारामध्येच बसून राहावं लागायचं.
आता परिस्थितीत थोडा बदल झाला आहे पिंपळदऱ्यात छोटासा तलाव झाल्यामुळे तलावाखालील विहिरींना जास्त नाही पण पिण्यापूर्त पाणी उपलब्द आहे त्यामुळे लांब का होईना पण गावामध्ये पाणी उपलब्द आहे.पाहिल्यासारखे पाण्यासाठी दुसऱ्या गावात जावे लागत नाही इतकाच काय तो बदल झालाय.
सिताराम कांबळे
गारवाडी,ता.अकोले,जि. अहमदनगर
Comments
Post a Comment