गायखा

____गायखा____

आम्ही रानातली पोरं
डोंगर चढतो भराभर
रोज गुरं चारायला
जातो उंच डोंगरावर

पाण्या पावसाला आम्ही
घेतो घोंगडीचा आधार
असतो घोंगडीचा घोंगता
सदा आमच्या डोक्यावर

नाही आम्हाला लागत गार
अासुद्या कितीही सतत धार
थांबतो आम्ही झाडाखाली
नाहीतर दगडाचा आधार

आमची गुरं ढोरं सारी
थांबतात झाडाखाली
सारी ओली होते माती
कशी बसणार खाली

दिवसभर ती चरून
सारा डोंगर फिरून
धरी घराची ती वाट
वासरासाठी हांबरून
.
गाया चरायला जाती
वर डोंगर माथ्याला
घरी गोठ्यात वासरू
बांधून ठेवती दाव्याला

रोज आंधार पडता
गाया येतात चरुन
समोर पाहून वासरा
काढी मायेनं चाटून

सिताराम कांबळे

Comments