____वरुणराजा___
खरं सांग वरुणराजा
तू इतका का कोपलास
आम्ही बेसावध आसतानी
घरात आमच्या घुसलास
आमची शिळीपाकी भाकर
तू खाऊन फस्त केली
उपाशी तापासी झोपायची वेळ
आमच्या मुलाबाळांवर आली
त्यांच्या झोपायच्या जागेवर
तूच येऊन झोपलास
खरं सांग वरुणराजा
तू इतका का कोपलास
तुला बघून सर्वच आता
दूर पळू लागले
तुझ्यापासून दूर जाऊन
निवारा शोधू लागले
तू आमच्या घरात येऊन
ठाण मांडून बसलास
खरं सांग वरुणराजा
तू इतका का कोपलास
घराबाहेर गेले ते बाहेरच राहिले
पाण्यात उभे राहून सुद्धा
ताहाणलेलेच राहिले
चिलिपिली त्यांची घरी
वाट पहात राहिले
असा कसा निर्दयी होऊन
मजा बघत बसलास
खरं सांग वरुणराजा
तू इतका का कोपलास
दोन दिवसात जीवन आमचं
उध्वस्त करून टाकलं
कसं तरी घर आवरून सावरून
डोकं आमचं झाकलं
तुझं रुद्र रूप दाखवून
विश्वास आमचा तोडलास
खरं सांग वरुणराजा
तू इतका का कोपलास
आम्ही रोज आतुरतेने
वाट तुझी बघत होतो
तू लवकर यावा म्हणून
देवालाही विनवीत होतो
पण आता खरं सांगतो
तू आम्हाला नकोसा झालास
खरं सांग वरुणराजा
तू इतका का कोपलास
तू इतका का कोपलास
सिताराम कांबळे
Comments
Post a Comment