लाडाची लेक

_____लाडाची लेक____

आमच्या सुंदर कोकणात,या पालघर जिल्ह्यात
आमच्या लाडक्या लेकीला,आम्ही दिलंय कोकणात

मोखाडा तालुका पालघरमधी
हळूच चालती चिकलामधी
चांदीचे पैंजन पायामधी
भात लावीती आवणामधी
घरधण्याच्या संगतीनं,रोज राबते शेतात
आमच्या लाडाच्या लेकीला,आम्ही दिलंय कोकणात

नवरा भेटला तो शेतकरी
भाकरीची पाटी डोक्यावरी
शेतात जाते भरदुपारी
मनापासून शेती करी
या दोघांचा आदर्श,सारे घेतात गावात
आमच्या लाडक्या लेकीला,आम्ही दिलंय कोकणात

सोन्याची नथनी नाकामधी
चांदीच्या याळा दंडामधी
नऊ वारी ती नेसुन साडी
मिरवत असते लग्नांमधी
एक वेगळीच ओळख,तिची आहे समाजात
आमच्या लाडक्या लेकीला,आम्ही दिलंय कोकणात

सोन्यासारखा संसार तिचा
नाव काढिते आईबापाचा
मान राखीते घरदाराचा
गाडा हाकीते संसाराचा
आता गेलेय रमुन ती तिच्या भरल्या संसारात
आमच्या लाडक्या लेकीला,आम्ही दिलंय कोकणात

माहेरावाणी सासर तीचं
विसरली नाव माहेराचं
आईबापांच्या आठवणीनं
भरून येतं मन हे तिचं
तिचा भरला संसार,आमच्या भरलाय मनात
आमच्या लाडक्या लेकीला,आम्ही दिलंय कोकणात

           सिताराम कांबळे
गारवाडी, ता.अकोले,जि. अ. नगर

Comments