____शेतकरी नवरा___
शेतकऱ्याची मी लेक
मला दिलंय डांगणात
नवरा मिळाला शेतकरी
रोज राबते शेतात
रोज सकाळी उठून
गोठा गुरांचा झाडीते
मोठी कसांडी भरून
रोज दूध मी काढीते
लांब पाणवठा पाण्याचा
दुडी हांड्यांची डोईवर
कळशी पाण्याची कमरेला
रोज चालते कोसभर
डोई भाकरीची पाटी
घेऊन जाते मी शेतात
गार झाडाच्या सावलीत
बसून खातो आनंदात
आखा दिवस आमचा
जातो चिखल मातीत
घरधण्याच्या सांगतीनं
भात लावते आवणात
आवणी,सोंगणी करिते
पात बैलांची धरिते
भात मळून झाल्यावर
रास खळ्यात लागते
माझा सोन्याचा संसार
आहे सर्वांचा आधार
मला आहेत सारखेच
माझं सासर,माहेर
अभिमानाने सांगते मी
माझा नवरा शेतकरी
जीवापाड प्रेम त्याचं
आहे लाखात लय भारी
सिताराम कांबळे
गारवाडी,ता.आकोले,जि. अ. नगर
Comments
Post a Comment