______धरण_____
जमीनी आमच्या गेल्या
पण फायदा नाही झाला
आमच्या नशिबी मात्र
नेहमी दुष्काळच आला
उशाला आहे धारण
पण आमचंच मरण
हांडाभर पाण्यासाठी
फिरतो आम्ही वणवण
पाणी दिसतंय धरणात
पण नाही येत हांड्यात
जेव्हा घसा पडतो कोरडा
तेव्हा पाणी येतं डोळ्यात
उन्हाळ्यालं कडक ऊन
घेतो आम्ही डोक्यावर
रिकामा हांडा घेऊन
फिरतो आम्ही गावभर
पाण्याच्या या टंचाईनं
जीवन आता नकोसं झालं
पाण्याची वाट बघता बघता
डोळ्यांचच आमच्या धरण झालं
सिताराम कांबळे
गारवाडी,ता.अकोले, अ.नगर
Comments
Post a Comment