हेच का जीवन

___हेच का जीवन____

मुलगी म्हणून जन्माला आले
हाच झाला का माझा गुन्हा
कोल्ह्या कुत्र्याची शिकार व्हावी
म्हणून का घेऊ मी जन्म पुन्हा

नाही मी कुठेच सुरक्षित
किती मी स्वताला जपावं
शाळा,कॉलेज,नोकरी सोडून
का मी घरातच बसावं

लबाड या लांडग्याच्या टोळ्या
उभ्या असतात चौका चौकात
दिसलं एखादं सावज त्यांना की
झडप घालतात भर रस्त्यात

कशा चुकवणार यांच्या नजरा
कसं जगावं या निष्ठुर जगात
घरातून बाहेर पडायचं म्हणजे
धडकी भरते माझ्या मनात

कधी कुठे होईल घातपात
याचा काहीच नसतो नेम
भर रस्त्यात सुद्धा आता
होऊ लागला कुणाचाही गेम

कुठे बलात्कार,कुठे आत्याचार
सर्रास आता होत आहेत
माझ्या माय भगिनी सांगा
कुठे आता सुरक्षित आहेत

नकोसं झालंय जगणं आता
काहीच अर्थ नाही जगण्यात
स्मशानात जळण्याआधीच
मी जळू लागले भर रस्त्यात

माझ्याच पोटी जन्म घेऊन
मलाच ते जाळू लागले
मग सांगा या हैवानांनी
जग हे कोणते पाहिले

       सिताराम कांबळे
गारवाडी,ता.आकोले,जि.अहमदनगर

Comments