आठवणीतले गाव (गारवाडी)

 मी तव्हा सातवी आठवीला आसल, आम्ही वाडीतली सगळी पॉरा देवळातच  झोपायचो,देवळाची पऊळ आख्खी पोरांनी भरून जायेची,तव्हा काय मोबाईल बिबाईल नव्हतं त्यात डोका घालून बसायला .अकरा बारा वाजपर्यंत बाता मारीत बसायचो.

       उन्हाळ्यात आमचा दुसऱ्या दिसाचा बेत रातीच ठरलेला असायचा.सकाळी झावळ्याच उठायचो,थोडा थोडा दिसाया लागला का लगेच निघायचो अडवाच्या अंगाला.आमच्या गावात रायवाळ आंबेची पकी झाडा हायात,ढवळ्या आंबा,एकाचा लय मोठा भोळ्यासारखा आंबा असायचा म्हणून त्याला भोळ्या आंबा म्हणायची,लय जुना झाड व्हता त्या मरून ग्याला आता.एका आंब्याचा लय जाड कातडा व्हता गोधडीसारखा म्हणून त्याला गोधड्या आंबा म्हणायचो,एक काळपड्या आंबा त्याला वरसातून दोन येळा आंब येयेचं म्हणून त्याला काळपड्या आंबा म्हणायचो,एक ढेकण्या आंबा त्याचा त्याचा आंबा जर चांगला पिकला नसल तं लय ढेकणासारखा पुंगाट वास यायचा म्हणून त्याचा ढेकण्या आंबाच नाव पडला व्हता.

        आम्ही सकाळी झावळ्याच उठलो का पहिला या आंब्यांखाली पाड पडलं आसतील ते खायचो काही टोप्यांमधी भरायचो,वर झाडाला दिसतील ते दगडीनी पाडायचो,मला तव्हा नेमय लय व्हता दोनतीन दगडीत पाड खाली पडलाच पाहिजे.

        पाड खाऊन झालं का मग आळवा खायाला मोर्चा वळायचा,कंच आळीव पिकतत त्या आम्हाली आधीच माहीत असायचा,आळवा खपतील ती खायेची काही खीशांमधी भरायची,चालता चालता करवंदांवर ताव मारायचा.

          ह्या सगळा झाला का मग डवऱ्याकं जायचा पाणी बिनी पेयाचा याडा वाकडा तोंड धिवायचा मंग बसायचा तिथंच थोडा टाईम मोहरीच्या माशा पंजायला येयाच्या त्या बघत,उन्हाच्या तिरामीत मोहरीच्या माशा बऱ्याच लांब जात तव्हर दिसत्यात, त्याच्यावरून अंदाज येतो मोहर कुठं आणि किती लांब आसल त्याचा,मंग त्या अंदाजाना जायाचा सापडली त ठीक नाहीतर दुसऱ्या दिशी परत तोच कारेकरम.

           यावढा झाला का मंग घरी  येयाच्या,नेहरी करायची,गुरा सोडायची आन जायाचा रानात घेऊन, दोनचार तास जनावरा जोगावली का परत नेयेची पानेव,परत ऊन ऊन झालेव मोहळच्या माशा इत्यातच पानेवं पंजायला,बघायच्या माशा कंच्या अंगाला जात्यात,गुरा देयेची रानात लावून आन बघायची मोहळा.

         आसा हा तव्हा आमचा रोजचा कारेकरम ठरल्याला असायचा,लय मजा केली तव्हा, आजूनय ध्यान आला का वाताटाय जावा परत पळून गावाला,जी लोका हा अनुभव घेऊन शहरात गेल्यात तेनली खरंच तिकडं कोंडल्यासारखा व्हत आसल.


                सिताराम कांबळे

      गारवाडी, ता.अकोले.जि. अहमदनगर

Comments