सकाळी सकाळी आठवण झाली
देहभान मी विसरून गेली
भेटायला आज तू येशील का
मला प्रेमाने जवळ घेशील का |धृ |
तुझ्याचसाठी शृंगार केला
तुला कसा रे नाही दिसला
एकदा जरा तू बघून घेना
भावना मनाच्या समजून घे ना
फिरायला बाहेर नेशील का
मला प्रेमाने जवळ घेशील का |१ |
वाट पाहुनी डोळे थकले
तुला कसे रे नाही कळले
दिवस आता सरून गेला
तरी आज तू नाहीच आला
दुपारी तरी तू येशील का
मला प्रेमाने जवळ घेशील का |२ |
तुझ्या भेटीची ओढ लागली
म्हणून तुला मी साद घातली
वाट तुझी मी पाहू लागले
गीत प्रेमाचं गाऊ लागले
साथ मला तू देशील का
मला प्रेमाने जवळ घेशील का |३ |
Comments
Post a Comment