तुझा शोध घेतांना
जीव कासावीस व्हायचा
अंगातून पाझरलेला घाम
मातीत मिसळून जायचा.
बऱ्याच वेळा स्वाभिमान
थोडीशी डळमळ करायचा
मेहनतीवर भरोसा ठेवून
भरकटण्या पासून सावरायचा.
भूक नावाची अवदसा
पोटात थयाथया नाचायची
माझ्या संयमाची परीक्षा
दररोज ती बघायची.
तुला हस्तगत करण्या
प्रयत्नांची शिकस्त करायचो
ठणकावून पुन्हा सांगतो
वाट ईमानदारीची धरायचो.
आज माझ्या टोपल्यात
आरामात विसावली आहेस
पाहून माझ्या प्रयत्नांना
मनातून सुखावली आहेस.
वचन देतो भाकरी
भूतकाळ विसरणार नाही
श्रीमंतीचा रुबाब दाखवून
अजिबात माजणार नाही.......!! 🙏🙏🙏🙏
Comments
Post a Comment